शिवाजीनगर गेंदालाल मिल परिसरात ही २७ वर्षीय तरुणी तिच्या कुटुंबासोबत राहते. पतीच्या एका मित्राचे सीमकार्ड ही तरुणी तिच्या मोबाईलमध्ये सध्या वापरत होती. ११ मार्चला ती आपल्या संपूर्ण परिवारासह अष्टविनायक दर्शनासाठी गेली होती. प्रवासादरम्यान रात्रीच्या वेळेस तिचे मेव्हणे (बहिणीचे पती) योगेश गोहेर यांचा तिच्या मोबाईलवर अश्लील संदेश आला. लगेचच तिने हा संदेश आपल्या मोठ्या बहिणीला दाखविला.
त्यानंतर १४ मार्चला पुन्हा पीडित महिलेच्या मोबाईलवर मेव्हण्याचे अश्लील संदेश आले. त्यानंतर मेव्हणीसाठी 'दिवाना' झालेल्या मेव्हण्याने तिला वारंवार फोन करायला सुरुवात केली. मात्र मोठ्या बहिणीचा संसार टिकावा यासाठी बराच काळ तिने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले.
अखेर हा प्रकार सहन न झाल्यामुळे मेव्हणीने आपल्या मेव्हण्याविरुध्द तक्रार नोंदवली. मोबाईलवर अश्लील संदेश पाठवून मानसिक त्रास दिल्याप्रकरणी पोलिसांनी मेव्हण्याला अटक केली.