कल्याण कसारा मार्गावरील आंबिवली येथील ‘द बॉलिवूड बीच’ या नावाने ढाबा असून या ढाब्यावर खुलेआम हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती कल्याण तालुका पोलीस ठाण्यात पदभार स्वीकारलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने या ठिकाणी गुरुवारी रात्रीच्या सुमाराला छापेमारी केली. त्यावेळी काही युवक हुक्का पिताना आढळून आले होते.
या छापेमारीत हुक्का पार्लर मालक असमत जवेर व त्याचे कामगार यांच्यावर सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा २००३ कलम ४ (क), २१ (क) प्रमाणे गुन्हा दाखल करत आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. छापेमारीत ४२ हजार ७५० रुपयांच्या हुक्क्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. अवैद्य धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्यास कल्याण तालुका पोलिसांनी सुरुवात केल्याने बेकायदा व्यवसाय थाटणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अधिक तपास पोलीस नाईक डी. डी. सावळे करत आहेत.