दोन्ही लग्नाचे फोटो
मिताली कुलकर्णी (२६, रा. लालचौकी, कल्याण) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. बाजारपेठ पोलिसांनी मितालीला अटक करून कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील टिळक चौकात राहणाऱ्या परब नामक युवकाशी मितालीचा विवाह २५ एप्रिल २०१३ मध्ये झाला. लग्नाच्या काही दिवसांनी मितालीने पतीच्या घरातील दागिन्यांवर हात मारून पळ काढला. त्यावेळी तिच्या सासरच्या मंडळींनी तिच्या विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावर गुन्हा न दाखल करता तिला शोधू असे पोलिसांकडून संगण्यात आले. मात्र तिचा शोध काही पोलिसांनी घेतला नाही.
त्यानंतर मितालीने डोंबिवलीतील आपटे नामक युवकासोबत दुसरा विवाह केला. त्याच्याही घरी राहिल्यावर काही महिन्यांनी दागिने घेऊन ती पसार झाली. मितालीची पहिली सासू तिच्या शोधात होती. त्यामुळे ती कल्याणच्या एका सोनाराच्या दुकानात आल्याचे समजताच तिने मितालीवर पाळत ठेवली. काँग्रेसच्या माजी नगरसेविका वंदना गीध यांच्या मदतीने काही महिलांना घेऊन सासूने मितालीला पकडून पोलिसांच्या हवाली केले. त्यावेळी मितालीने अनेक सोनारांची फसवणूक केल्याची बाबही समोर आली.
मिताली ही सोनाराकडून दागिने खरेदी करून त्यांना खोटा धनादेश देत असे. हे धनादेश वटलेले नसल्याने मितालीला पकडताच कल्याणातील तीन सोनारांची फसवणूक केल्याची बाब पोलिसांसमोर आली. पोलिसांनी एका सोनाराच्या तक्रारीच्या आधारे तिला अटक करून कल्याण न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयातच तिचा पहिला आणि दुसरा पती असे दोघेही हजर होते. त्यांनीही न्यायालयाकडे त्यांची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली.
यावर न्यायालयाने त्यांना कौटुंबिक न्यायालयात न्याय मागण्याचा सल्ला दिला. न्यायालयाने मितालीला न्यायालयीन कोठडी सुनावली असून तिची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली आहे. मितालीने अन्य किती सोनारांना गंडा घातला आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

आरोपी मिताली कुलकर्णी