मार्च महिन्यात लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. देशभरात भाजपविरोधी आघाडीने जनतेसमोर मनसुबे व्यक्त केले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने युती न केल्यास त्याला उत्तर देण्यासाठी भाजप नेत्यांची प्लॅन 'बी'च्या दृष्टीने तयारी सुरू आहे. दक्षिण मध्य मुंबईतून रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दक्षिण मध्य मुंबईमधून केंद्रीय मंत्री रामदास आठवले भाजप कोट्यातून लढण्यास उत्सुक आहेत. मात्र, आठवलेंना भाजपने राज्यसभेवर निवडून आणले आहे. हा मतदार संघ दलित, मागासवर्गीय आणि श्रमिक मतदारांचा मनाला जातो. माटुंगा, दादर आणि शिवाजी पार्क आणि सायन या भागात भाजपचे लाखो मतदार आहेत. तसेच गोयल यांच्या मातोश्री चंद्रकांता गोयल तीन वेळा माटुंगा मतदार संघातून विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. त्यामुळे भाजपला या मतदार संघात जनाधार असल्याचा भाजपचा मतप्रवाह आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी या मतदार संघात जनसंपर्क ठेवला आहे. मात्र, त्यांना भाजपच्या मतांशिवाय लोकसभेवर जाता येणार नाही, असेही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटत आहे. शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास दक्षिण मुंबई या मतदार संघात भाजपचा कोणताही मोठा चेहरा नाही. त्यामुळे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या नावाची भाजपमध्ये जोरदार चर्चा आहे. त्याचबरोबर गोयल यांनी गेल्या २ वर्षात दक्षिण मध्य मुंबईत कार्यकर्त्यांच्या भेटी वाढवल्या असल्याचेही म्हटले जात आहे.