मात्र या कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा गोंधळ शांत करत, आपले निवेदन विधीमंडळासमोर सादर केले.
मुख्यमंत्र्यांचे विधानसभेतील निवेदन
- काल उच्च स्तरीय शिष्टमंडळाने केंद्रीय कृषी मंत्री व अर्थ मंत्र्यांची भेट घेतली.
- राज्य सरकारची शेतकऱ्यांना मदत करण्याची मानसिकता आहे.
- माननीय अर्थमंत्री अरुण जेटली व कृषी मंत्री राधामोहन यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. केंद्र सरकारने मदतीचे आश्वासन दिले आहे. यात राज्यसरकारही आपले योगदान देईल.
- राज्यात १ कोटी ३४ लाख शेतकरी आहेत. त्यापैकी ३१ लाख शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे.
- जोपर्यंत त्यांच्या कर्जाचा बोजा कमी होत नाही तोपर्यंत त्यांना नवीन कर्ज मिळणार नाही. यामागे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये अशी सरकारची भूमिका आहे.
- गेल्या दोन वर्षांमध्ये कृषी क्षेत्रात गुंतवणूक करून इंस्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टम सुधारण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही केंद्राला मदत मागितली आहे.
मुख्यमंक्षी निवेदन करत असतानाही विरोधकांची घोषणाबाजी कायम होती. मुख्यमंत्र्यांचे निवेदन संपल्यावर परिषदेचे कामकाज २ वाजेपर्यंत पुन्हा तहकूब करण्यात आले आहे.
विरोधकांची घोषणाबाजी
मंत्री आणि आमदार विधानभवनात प्रवेश करत असताना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी जोरदार नारे लावले.
''आले रे आले, हात हलवत आले.. दिल्ली वरून आले, हात हालवत आले''. ''नागपुरचा पोपट काय म्हणतो, कर्जमाफीसाठी नाय म्हणतो.'' अशाप्रकारच्या घोषणा विरोधकांनी दिल्या. तर शिवसेनेच्या मंत्र्यांना बघून.. काढले काढले… येड्यात काढले, अशा घोषणा विरोधी आमदारांनी दिल्या.
दरम्यान, कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर 'ठाम' असलेल्या शिवसेना नेत्यांचे मन वळवण्यात भाजपला यश आले असल्याचे, सूत्रांकडून बोलले जात आहे.