याप्रकरणी ७ जणांच्या टोळक्याविरोधात भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने ‘त्या’ व्हायरल व्हिडिओला कलाटणी मिळाली आहे.
तैय्यब मोहमद इस्माईल, मोहमद अराफत, समाजसेवक मलीक यांचा मुलगा अजहर आणि त्यांचे ४ ते ५ साथीदारांवर अपहरण आणि ठार मारण्याची धमकी देत माफीनाम्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडीच्या एका रस्त्यावर ११ मार्च रोजी प्रेयसी रागावल्याने एका प्रियकराने रस्त्याच्या मधोमध कार उभी करून तिची मनधरणी केली होती. यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यानंतर दोघेही कारमध्ये बसून रवाना झाले होते. त्याच दरम्यान कोणी तरी या घटनेचे चित्रिकरण मोबाईल कॅमेऱ्यात कैद करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हायरल व्हिडिओ भिवंडीत राहणाऱ्या एका टोळक्याच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आल्याने त्यांची माथी भडकली. त्यांनी व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या प्रियकराचा शोध घेऊन १३ मार्च त्या मुलाचे अपहरण करून, या दोघांना मुंबई-नाशिक मार्गावरील एका धाब्यावर नेऊन मारहाण केली. त्यानंतर त्या प्रियकराचा जबरदस्तीने माफीनाम्याचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेमुळे घाबरलेल्या प्रियकराने जीवाच्या भीतीने भिवंडीतून पळ काढत तब्बल ७ दिवस नाशिक शहारत लपून बसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
दरम्यान, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या प्रेमी युगलाचे घरच्यांच्या सहमतीने लग्न जमले होते. मात्र, समाजाचा ठेका घेणाऱ्या काही जणांनी मागचा-पुढचा विचार न करता त्या मुलीला आणि तिच्या घरच्यांना सोशल मीडियावरून धमक्या दिल्या. यामुळे त्या मुलीने हिंमत करून अखेर पालकांसोबत पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या घटनेबाबत सर्व माहिती घेऊन मुलीच्या घरच्यांना आश्वासन दिले की, या घटनेची आम्ही गंभीर दखल घेऊ मात्र, मुलाला घेऊन या. असे सांगितल्याने प्रेयसीने प्रियकराला बोलावून घेतले. प्रियकराने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात घडलेल्या घटनेचे कथन करताच ७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक कटके करीत आहेत.