भुसावळ शहरातील विकासकामांचे भूमिपूजन, उद्घाटन तसेच खासदार रक्षा खडसे यांच्या कार्यवृत्तांताच्या प्रकाशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २१ फेब्रुवारीला भुसावळ दौऱ्यावर येत आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा खडसे यांनी मंगळवारी भुसावळात आढावा घेतला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राजकीय मुद्यांवर भूमिका मांडताना ते बोलत होते.
यावेळी पत्रकारांनी खडसेंना आगामी लोकसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपाविषयी विचारणा केली असता ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीचा निर्णय भाजपच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडून घेतला जातो. यामुळे कोणाची उमेदवारी कापली जाईल, कोणाला उमेदवारी मिळेल? यासर्व चर्चा निष्फळ आणि मनोरंजन करणाऱ्या आहेत. खासदार रक्षा खडसेंचे तिकीट कापणार अशाही चर्चा रंगते. मात्र, चिल्लर लोकांच्या चर्चेतून केवळ सर्वसामान्यांचे टॅक्स फ्री मनोरंजन होते, असे खडसे यांनी सांगितले.
रेल्वे प्रशासनाने अतिक्रमण काढल्यानंतर बेघर झालेल्या भुसावळातील अडीच हजार लोकांना हक्काची घरे मिळावीत, यासाठी महाराष्ट्र राज्य हौसिंग कार्पोरेशनकडे पाठपुरावा सुरू आहे. आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण झाली तर भुसावळच्या सभेत मुख्यमंत्री मोठी घोषणादेखील करू शकतात, असेही खडसे म्हणाले.