सांकेतिक छायाचित्र
महाराष्ट्र राज्यामध्ये सन २०११ च्या जनगणनेच्या उपलब्ध आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर प्रमाण ८९४ एवढे आहे. सन २००१ च्या जनगणनेच्या तुलनेत हे प्रमाण १३ अंशाने कमी झाले आहे. भंडारा जिल्ह्याचे सध्याचे प्रमाण ९५९ आहे. महाराष्ट्रातील ० ते ६ वर्ष वयोगटातील नागरी नोंदणी जन्माच्या वेळचे लिंग गुणोत्तर प्रमाण २०१५ मध्ये ९०७ होते तर २०१६ मध्ये ते ८९९ एवढे झाले. म्हणजे ८ अंकांनी घटले. ही बाब गंभीर आणि चिंताजनक आहे.
सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथे झालेल्या नुकत्याच घटनेवरुन लिंग निदान होत असल्याचे निदर्शनास येते. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. पीसीपीएनडीटी सारखा कडक कायदा अस्तित्वात असताना गर्भलिंग निदान होत असल्याच्या गंभीर घटनेची दखल घेत शासनाने सर्व रुग्णालयाच्या तपासणी मोहिम हाती घेतली आहे. या पार्श्वभूमिवर नागरिकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. ज्या सोनाग्राफी केंद्रावर गर्भलिंग निदान होत आहे, अशी माहिती नागरिकांना मिळाल्यास ही माहिती तत्काळ जिल्हा रुग्णालय, जिल्हयातील महत्वाचे अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांना कळवावी. १०४ आणि १८००२३३४४७५ या टोल फ्री क्रमांकावर ही माहिती नागरिक देऊ शकतात. त्याप्रमाणे www.amchimulgi.gov.in या संकेतस्थळावर ही माहिती दिल्यास त्याची तत्काळ दखल घेण्यात येते. गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्ती किंवा सोनोग्राफी केंद्राबाबत माहिती देणाऱ्या व्यक्तीस २५ हजार रुपयांचे रोख बक्षिस देण्यात येते. माहिती खरी ठरल्यानंतरच ही रक्कम देण्यात येते.
नागरिकांनी खरी आणि खात्रीशिर माहिती पुरवावी विनाकारण सोनोग्राफी केंद्राची बदनामी होईल अथवा निष्पाप डॉक्टरला मनस्ताप होईल, अशी माहिती देऊ नये. त्याचप्रमाणे एखाद्या सोनाग्राफी केंद्रावर लिंग निदान होत असल्याची खात्रीलायक माहिती असल्यास डिकॉय केस करण्यासाठी गरोदर महिलांनी संमती दर्शविल्यास त्यांचेही नाव आणि ओळख गुप्त ठेवून जिल्हा प्रशासन गर्भ लिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रावर कडक कारवाई करण्यासाठी पुढाकार घेईल. या प्रकरणातही गरोदर महिलेस रोख रक्कम देण्याची तरतुद आहे. या दोन्ही योजनेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच गर्भ लिंग निदान चाचणी करण्याचा आणि करणाऱ्याचा सक्त विरोध करावा.