PC - BCCI Domestic
शेष भारताच्या हनुमा विहारीने ११४ धावा करत दमदार शतक केले. तर सलामीवीर मयंक अग्रवालने केलेल्या ९५ धावांच्या शानदार खेळीमुळे शेष भारत संघाची धावसंख्या ३०० पार पोहचवली.
रणजी करंडक स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावणाऱ्या विदर्भच्या संघाकडून आदित्य सरवटे आणि अक्षय वखारेने प्रत्येकी ३ बळी टिपले. तसेच रजनीश गुरबानीने २ तर यश ठाकूर आणि अक्षय कर्नेवार यांना प्रत्येकी १ गडी गारद करता आला.
भारताचा आघाडीचा कसोटीपटू आणि शेष भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेला पहिल्या डावात मोठी खेळी करता आली नाही. तो फक्त १३ धावा करून बाद झाला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रणजी विजेता विदर्भ संघ कशी फलंदाजी करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
शेष भारतीय गोलंदाजांसमोर मुख्यतः विदर्भाच्या वासिम जाफरला लवकर बाद करण्याचे आव्हान असेल. गेल्या वर्षी झालेल्या इराणी ट्रॉफीत वासिमने द्विशतक ठोकले होते.