कांद्याचा भाव वाढल्यावर संसदेत गोंधळ करणारे आज शेतकऱ्याला भाव नाही तर गप्प का? - शरद पवार
पवार शिरूर तालुक्यातील वढू येथे माध्यमिक विद्यालयाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील, माजी आमदार अशोक पवार, विलास लांडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज व गोविंद गोपाळ गायकवाड यांच्या समाधी स्थळांना भेट दिली.
सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. शेतमालाला हमीभाव मिळत नाही. त्यांच्याबाजूने आता कुणी बोलत नाही. परंतु, सत्ताधाऱ्यांना ७० टक्के खाणाऱ्यांची काळजी आहे, पण ३० टक्के पिकवणाऱ्यांची नाही, अशी टीका त्यांनी भाजप सरकारवर केली. दरम्यान, विद्यालयाला माझे नाव दिले, तर त्यातून माझी बदनामी होईल. त्यामुळे तुम्ही माझे नाव विद्यालयाला देऊ नका, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. त्यामुळे माझी बदनामी होणार नाही, याची काळजी घ्या, असेही ते म्हणाले.