मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप पहिल्यांदाच बहुमताने सत्तेत आली. पण, मोदींचा उदय हा पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या कारकिर्दीचा अस्त ठरला. अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंग अशा नेत्यांना बाजूला सारले गेले. याबरोबर शत्रुघ्न सिन्हांसारखे स्टार नेते सुद्धा अडगळीला पडले. वाजपेयी सरकारच्या काळात सिन्हांकडे मंत्रीपद होते. ही सल त्यांच्या तोंडून अनेकदा बाहेर पडली आहे. पण, सिन्हांनी उघड याबद्दल वाच्यता केली नाही. सरकारच्या कारभारावर आणि मोदींच्या कार्यपद्धतीवर ते टीका करत असतात.
सिन्हा संधीसाधू - राजीव प्रताप रुडी
शत्रुघ्न यांच्या आरोपांकडे दुर्लक्ष करण्याची पद्धतच आतापर्यंत भाजपने अवलंबली होती. पण, यावेळी प्रथमच भाजप प्रवक्ते राजीव प्रताप रुडी यांनी ठोस वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, की शत्रुघ्न सिन्हा खूप चतुर आहेत. मागच्या पाच वर्षात ते पक्षाच्या एकाही कार्यक्रमात सामील झाले नाहीत. ते स्वतःच्या मनाप्रमाणेच वागत असातात. स्वतःला ते भाजपचे म्हणवतात पण, विरोधकांच्या सभेत सहभागी होतात.
रुडी पुढे म्हणाले, की सिन्हा खासदार असल्याचे फायदे घेऊ इच्छितात. म्हणूनच पक्षाने व्हीप जारी केल्यावर ते संसदेत हजर राहतात. पण, इतर पक्षांच्या व्यासपीठावर जाऊन सरकारवर टीका करतात. ते संधीसाधू आहेत. पक्ष त्यांच्यावर कारवाई करेल असा विश्वास असल्याचे रुडी म्हणाले.
चौकीदार चोर असल्याचा उच्चार
दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांनी बंगाल येथील सभेत बोलताना भाजपवर जोरदार प्रहार केले. ते म्हणाले, की मला पक्षातून काढून टाकले जाण्याची कसलीही चिंता नाही. मी जनतेसाठी भाजपमध्ये आहे. मी बोलतो कारण ते देशाच्या हिताच्या आहे.
राफेल करारावर बोलताना त्यांनी मोदींना कडक टोला लगावला. ते म्हणाले, की मी असे म्हणत नाही की तुम्ही दोषी आहात आणि असेही म्हणत नाही की निर्दोष आहात. पण, प्रश्नांची उत्तरे दिली जात नसतील तर लोक तर म्हणतीलच की चौकीदार ही चोर है.