केंद्राच्या १० टक्के आरक्षणाच्या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील होतकरू विद्यार्थी आणि तरुणांना शिक्षण आणि नोकऱ्या मिळणे शक्य होणार आहे. यामुळे गरीब कुटुंबात जन्म झालेल्या मोदींनी समाजातील सर्वच घटकातील गरीबांचा संवेदनशीलपणे विचार केला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील बाबासाहेब आंबेडकर आहेत, असे वक्तव्य उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी केले आहे.
गरीब घरात जन्माला आलेल्या मुलाने इतर गरीबांचा विचार केला. त्यांना पुढे आणण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतला असे रावत म्हणाले. त्यांनी या निर्णयासाठी पंतप्रधानांचे अभिनंदन केले आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय म्हणजे ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेतील एक पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि तरुणांसाठी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षणाच्या विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली आहे. आर्थिक निकषांच्या आधारावर हे आरक्षण देण्यात येणार असून यासाठी १२४ वी घटनादुरूस्ती विधेयक २०१९ हे बहुमताने मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या समर्थनात ३२३, तर ३ खासदारांनी याविरोधात मतदान केले.