भाजप कार्यकर्त्यांना पळवून लावताना नागरिक
राजस्थान येथे निवडणूक प्रचाराला उधाण आले आहे. सांगानेर विधानसभा क्षेत्रातून अशोक वाटिका हे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. ते प्रचारासाठी येथील वार्ड क्रमांक ४२ येथे गेले होते. त्यावेळी तेथील महिलांनी चक्क त्यांची हकालपट्टी केली. एवढेच नाही तर त्यांना पळवून लावण्यासाठी दांड्यांचाही उपयोग केला.
निवडणुकांच्या वेळी भाजपचे उमेदवार मतदान मागण्यासाठी येतात. मात्र, वस्तीत चांगले रोड नाहीत तसेच सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था नाही. त्यांच्यासाठी आम्ही मुख्य रस्ता बंद केला होता. प्रचारासाठी येताना सांडपाणी साचून असलेल्या रस्त्यावरुन त्यांनी यावे अशी आमची इच्छा होती. मात्र, ते त्या रस्त्याने न येता मुख्य रस्त्यावरुन आले. आम्ही कसे जीवन जगतो हे त्यांना दाखवण्याचा आमचा हेतु होता, असे स्थानिकांनी या प्रकरणा बद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
भाजपचे उमेदवार अशोक वाटिका हे या क्षेत्राचे महापौर आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कोणत्याही प्रकारचे विकास काम केलेले नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. त्यांना या ठिकाणचे नागरिक मतदान करणार नाहीत, असे सरळ स्थानिकांनी जाहीरही केले आहे. मात्र, हे सर्व प्रकार राजकीय हेतुने केले जात आहे, असा अशोक वाटिका यांचा आरोप आहे.