जयप्रकाश नारायण यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९०२ रोजी बिहारच्या सिताबदीयारामध्ये झाला होता. १९९९ मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय त्यांना १९६५ मध्ये मॅगसेस पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. पाटणा येथील विमानतळाला देखील त्यांचेच नाव देण्यात आले आहे.
देश स्वातंत्र्य झाल्यापासून म्हणजेच १९४७ पासून १९७७ पर्यंत देशात जवळजवळ ३० वर्षे काँग्रेस या एकाच पक्षाची सत्ता होती. १९७१ च्या पाकिस्तानवरच्या विजयानंतर इंदिरा गांधींची लोकप्रियता वाढली. त्यांना कोणी प्रतिस्पर्धी उरला नाही. त्यातच २५ जून १९७५ साली त्यांनी देशावर आणीबाणी लादली. आणीबाणीमुळे लोकांत सुप्त असंतोष होता. पुढे जेपींच्या प्रेरणेने हा उद्रेक प्रचंड ताकदीने पुढे आला. ५ जून १९७४ च्या पाटणा येथील सभेत बोलताना सहजच त्यांच्या मुखातून ‘संपूर्ण क्रांती’ हे शब्द बाहेर पडले. त्यांनी म्हटले की, ‘हे आंदोलन बिहार छात्र संघर्ष समितीच्या केवळ दहा-बारा मागण्या मान्य करून घेण्यासाठी नसून देशात सर्वागीण बदलसाठी आहे.
आणीबाणी पुकारून इंदिरा गांधी या हुकूमशहा बनल्या होत्या. २२ जुलै १९७५ रोजी लोकसभेत स्वत: इंदिरा गांधी यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले की, ‘यू कॉल्ड मी डिक्टेटर- व्हेन आय वॉज नॉट; नाऊ ‘येस, आय अॅम.’’
इंदिरा गांधी यांच्याविरोधातील आंदोलनाची सुरुवात
देशात १९७४ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसची सत्ता होती. त्यावेळी इंदिरा सरकारची जनताविरोधी धोरणे, प्रचंड भ्रष्टाचार, महागाई, इ. मुळे जनता त्रस्त झाली होती. तेव्हा लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी इंदिरा गांधी यांना पत्र लिहिले. देशातील वाईट अवस्थेबद्दल त्यांनी आपल्या पत्रात लिहीले होते. त्यानंतर इतर खासदारांना पत्र लिहून इंदिरा गांधी यांचे निर्णय लोकशाहीसाठी कशी धोक्याची घंटा आहे, याबद्दल सांगितले.
लोकपालची केली होती मागणी
जयप्रकाश नारायण यांच्या या पत्रांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. कारण, पहिल्यांदाच पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविरोधात कोणीतरी आवाज उठवला होता. यासोबतच त्यांना खासदारांना आपल्या पत्रात लोकपाल बनवणे आणि लोकायुक्त नियुक्त करण्याची मागणी केली होती. ऐवढेच नाही तर नारायण यांनी भष्ट्राचाराविरोधात स्थापन करण्यात आलेल्या समितीचा आवाज दाबण्याचा आरोप त्यांनी इंदिरा गांधी यांच्यावर केला होता.
गुजरातमधून झाली होती सुरुवात
इंदिरा गांधी राज्यांमधील काँग्रेस सरकारकडून देणगी घेण्याची मागणी केली होती. या दरम्यान गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री चीमन भाई यांच्याकडेही १० लाख रुपयांची मागणी केली होती. ट्रेझरी वाढवण्यासाठी अनेक वस्तूंच्या किमती देखील वाढवल्या होत्या. यानंतर राज्यात आंदोलन सुरू झाले. पोलिसांच्या निष्ठुरतेमुळे अनेक आंदोलक मारले गेले. चीमन भाई यांच्यामुळे आंदोलन आणखीच चिघळले. जयप्रकाश नारायण यांनी या आंदोलनाचे समर्थन केल्यानंतर त्यांना गुजरातला बोलवण्यात आले.
या कालावधीत चिमनभाईंनी राज्यपालांच्या मदतीने सत्ता आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न केला. पण, पुढे ९ फेब्रुवारी १९७४ रोजी जयप्रकाश नारायण गुजरातला येण्याच्या २ दिवस आधीच चिमनभाई यांनी राजीनामा दिला. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. यानंतर मोरारजी देसाई यांनी नारायण यांच्यासोबत पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी केली. सोबतच हे आंदोलन बिहार सारख्या इतर राज्यांमध्येही पसरू लागले. रेल्वेचे लाखो कर्मचारी संपावर गेले. ज्यामुळे इंदिरा गांधी यांच्यासमोर मोठ्या समस्या उभ्या राहू लागल्या.
बिहारमध्ये आंदोलनचा परिणाम
गुजरातप्रमाणे बिहारमध्येही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. आपला मोर्चा त्यांनी विधानसभेकडे वळवला. यानंतर विद्यार्थ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. यावेळी झालेल्या गोळीबारात अनेक विद्यार्थी मारले गेले. यानंतर जेपी यांनी आंदोलनाची कमान संभाळावी, अशी मागणी सुरू झाली. या आंदोलनाची सूत्रे आपल्या हाती घेण्याआधी जेपी म्हणाले, या आंदोलनातील कोणताच व्यक्ती हा कोणत्याही पक्षाशी संबंधित नसावा. परिणामी, जेपी यांचा शब्द मानून अनेक पक्षांशी संबंधित असलेल्या विद्यार्थ्यांनी राजीनामा देत जेपी यांची वाट धरली. यात काँग्रेसचे देखील अनेक विद्यार्थी होते. या सर्व विद्यार्थ्यांनी बिहार छात्र संघर्ष समितीच्या बॅनरखाली आंदोलनात उडी घेतली. यानंतर जेपी यांनी आंदोलनाची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि बिहारचे मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली.
जेपी यांची चेतावनी
जेपी यांनी काळा बाजारा विरोधात आंदोलने केली. हे आंदोलन पुढेही सुरुच राहावे, असे ते म्हणाले. त्यावर काही लोक हे राजकारणात सक्रीय होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे इंदिरा गांधी यांनी म्हटले. जेपी आणि इंदिरा गांधी यांच्यातील वादाने हे आंदोलन आणखी वाढत गेले. पुढे जेपी यांनी हे सरकार हटविण्यासाठी आपले आंदोलन आणखी तीव्र केले.
सत्तेला हादरून सोडणारे आंदोलन
जेपी यांनी सरकारविरोधात ८ एप्रिल १९७४ रोजी एक मोर्चा काढला. ज्यात सत्तेविरोधात आक्रोश असणाऱ्या लोकांचा समावेश होता. जेपी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामध्ये हजारो नाही तर लाखो लोक सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे इंदिरा गांधी यांच्या हातातून सत्ता निसटू लागली. पुढे इंदिरा गांधी यांच्या विरोधात वातावरण तापले. त्याच कालावधीत १८ जानेवारी १९७७ रोजी इंदिरा गांधी यांनी अचानकच मार्चमध्ये लोकसभा निवडणुका घेण्याची घोषणा केली. निवडणूक निकालानंतर इंदीरा गांधी यांना सत्ता गमवावी लागली. शिवाय त्यांना आणि संजय गांधींना पराभूत व्हावे लागले. २१ मार्च रोजी आणीबाणी संपली. पण, आपल्या मागे लोकशाहीचा सर्वात मोठा धडा सोडून गेली.
जयप्रकाश नारायण यांनी स्वातंत्र्यानंतरच नाही तर त्या आधीही महात्मा गांधी यांच्यासोबत भारत छोडो यांसारख्या आंदोलनाला यशस्वी केले होते. ८ ऑक्टोबर १९७९ मध्ये पाटणा येथे त्यांचे आजाराने निधन झाले.