औरंगाबादचे हे भाविक रूद्रप्रयाग येथे अडकले आहेत. उत्तराखंडातील हाथीपहाडजवळ दोन डोंगराच्या मधल्या भागात दरड कोसळल्याने रस्ता पूर्णत: बंद पडला आहे. शनिवारी दुपारपर्यंत या रस्त्यावरील नियमित वाहतूक सुरू होईल, असा अंदाज संबंधित अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. जे भाविक बद्रीनाथकडे गेले आहेत, त्यांना तिथेच थांबण्याचे आदेश देण्यात आले असून, २४ तासानंतरच परतीचा प्रवास करावा, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
प्रत्येक वर्षी हाथीपहाड हा डोंगराळ भाग भाविकांसाठी त्रासदायक ठरत असतो. शिवाय दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात व रस्ता बंद पडतो. पावसाळ्यात रस्ता बंद पडण्याच्या घटनांनी भाविकांना दरवर्षी त्रास सहन करावा लागतो. शुक्रवारी झालेल्या भूस्खलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहनांना पुढे न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे, ही माहिती प्रशासनाने दिली.
मोठ मोठे दगड रस्त्यावर पडल्यामुळे सुमारे ६५ मीटर अंतरापर्यंतचा रस्ता खराब झाला आहे. रस्त्यावर अडकलेल्या भाविकांच्या खाण्याची आणि राहण्याची सोय करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
याच बरोबर उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेवर असणाऱ्या यात्रेकरुंसाठी हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून दिले आहेत. ते असे - 0135-2559898 ,2552626, 2552627,2552628 आणि 1364