बाळासाहेबांची भूमिका साकारण्यासाठी कशा प्रकारची तयारी करावी लागली याबद्दल नवाजुद्दीन म्हणाला, "सर्वात पहिल्यांदा जेव्हा मला हा रोल ऑफर झाला तेव्हा मी राऊत साहेबांना म्हटलं की माझी मस्करी तर करत नाही ? त्यानंतर मी खाली आलो तेव्हा मी खूप खूश होतो आणि नर्व्हसही. कारण खूप अवघड रोल होता.. अर्थात..कशा प्रकारची तयारी करावी लागेल..याबद्दल थोडा नर्व्हसही झालो होतो.
नवाज पुढे म्हणाला, "त्यांच्या खासगी गोष्टी, त्यांच्या सवयी , चारित्र्य, बोलणे, विचार करणे हे कुठेच इंटरनेटवर मिळणार नाही. त्यांची भाषणे मिळतील, त्यांच्या मुलाखती मिळतील पण, ज्यावर आम्ही लक्ष केंद्रीत करीत होतो, त्यातूनच कॅरॅक्टरायझेशन करायचे होते. त्यासाठी राऊत साहेबांनी खूप मदत केली. बाळासाहेबांच्या बद्दल आमच्या अनेक चर्चा झाल्या.. ते कशा प्रकारचे व्यक्ती होते आणि त्यातूनच तयारीला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांची भाषणे, मुलाखती इंटरनेटवर पाहिली आणि त्यानंतर सिनेमाची सुरुवात केली."
'माणसाची ताकत छाती किती इंचाची आहे यावर ठरत नसतात, ताकत मेंदूत असते', असा डायलॉग ठाकरे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आहे. हा डायलॉग भाजप आणि मोदींना उद्देशून असल्याचा तर्क अनेकजण काढत आहेत, याबद्दलचा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला होता.
याला उत्तर देतान राऊत म्हणाले, "बाळासाहेबांच्या छातीचा उल्लेख अनेकांनी राजकारणात केला. त्यात शरद पवारसुध्दा आहेत. निवडणूकीच्या मैदानामध्ये एकमेकांची हाडे मोजलेली आहेत. त्यामध्ये बाळासाहेबांच्या शरीरयष्टीचा, छातीचा उल्लेख पवारांनी अनेकवेळा केलेला आहे. बाळासाहेबांना त्यांनी काही पदव्या दिल्या होत्या अर्थात निवडणूकीच्या लढाईमध्ये फार कोणी मनावर घेत नव्हते. पण उलट सुलट प्रत्यूत्तरे... दोन द्यायचे चार घ्यायचे, त्यामुळे तुमच्या डोक्यात जो किडा वळवळतोय ...छाती छाती...!", असे म्हणत राऊतांनी या प्रश्नाला हुशारीने बगल दिली.
'ठाक'रे हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला रिलीज होत आहे. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा महाराष्ट्रात रंगल्याचे दिसून येते. मराठी आणि हिंदी या दोन भाषेत या चित्रपट रिलीज होईल.