टायगरने इन्स्टाग्रामवर त्याच्या डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो ह्रतिकच्या 'एक पल का जीना' या सुपरडुपरहिट गाण्यावर त्याच्यासारखाच डान्स करताना दिसतोय. ह्रतिकच्या 'कहो ना प्यार है' या पहिल्याच चित्रपटातील या गाण्याने तरुणाईत त्याच्या डान्सची क्रेझ निर्माण केली होती.
टायगरने हा व्हिडिओ शेअर केल्यावर काही तासातच हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. टायगरच्या डान्सची बॉलिवूड कलाकारांनीही प्रशंसा केली आहे.
टायगर आणि ह्रतिक दोघेही एकत्र त्यांच्या आगामी चित्रपटात झळकणार आहेत. ह्रतिकसोबत काम करण्याची संधी मिळत असल्याने टायगर खूप आनंदी असल्याचे त्याने या पोस्टद्वारे म्हटले आहे. टायगर आणि ह्रतिक एकत्र येणार म्हटल्यावर त्यांचा आगामी चित्रपट हा नक्कीच डान्स आणि अॅक्शनने भरलेला असणार, यात शंका नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहे. यात वाणी कपूर ही अभिनेत्री झळकणार आहे. चित्रपटाची कथा जरी गुलदस्त्यात असली, तरी चाहत्यांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. त्यापूर्वी टायगर 'स्टुडंट ऑफ द ईयर-२' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून अनन्या पांडे आणि तारा सुतारीया या नवोदित अभिनेत्री बॉलिवूड डेब्यू करत आहेत.