पवनी नगरपरिषदेला नगर विकास खात्याकडून मिळालेल्या आदेशानुसार प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी मडावी यांनी पवनी शहरातील नागरिकांकडून थकीत कर वसूल करणे सुरू केले आहे. तर यात खासगी मालमत्ता धारकांसह शासकीय कार्यालयांचा समावेश आहे. आज पवनी शहरातील नागरिकांच्या सुरक्षेकरीता उघडण्यात आलेल्या पोलीस ठाण्याला सील ठोकल्याने कर्मचाऱ्यांना आणि तक्रार दाखल करण्याकरीता आलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
यात पवनी पोलीस ठाण्याने मागील ३ वर्षापासून कर न भरल्याने ही कार्यवाही करण्यात आली. मार्च अखेरपर्यंत १ लाख १९ हजार रुपयाचा थकीत कर भरणार असल्याचे सांगितल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सील काढण्यात आले. तर शहरातील वीज वितरण कंपनीच्या आणि पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला देखील सील ठोकण्यात आल्याने कार्यालयातील कामकाज ठप्प पडले आहे. मात्र, याचा नाहक त्रास कामानिमित्त आलेल्या नागरिकांना सहन करावा लागत आहे.